top of page

​शिकणे, शिकविणे, जगणे काही विचार

Updated: Feb 20


- विपुल शहा, बारामती, महाराष्ट्र


Learning, Teaching, Living, Some Thoughts (Educational Philosophy)



अगदी इयत्ता पहिलीपासून मी शालेय जीवनामध्ये अतिशय मनःपूर्वक भाग घेतला. पाठ्यपुस्तकांचे पाठांतर, निरंतर अभ्यास व प्रत्येक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवून एक 'आदर्श विद्यार्थी' होण्याचा तसेच माझ्या सर्व शिक्षकांचा आवडता होण्याचा मी सतत प्रयत्न केला. दहावीच्या परीक्षेत दोन मार्कांनी माझे नाव राज्य स्तरावरील 'मेरिट लिस्ट' मध्ये येऊ शकले नाही याची मोठी खंत मनामध्ये शिल्लक राहून गेली होती. स्पर्धात्मक युगामध्ये सतत 'पहिला क्रमांक' पटकावण्याचा व अधिकाधिक गुण मिळवून प्रशंसा करून घ्यायची हेच खरे यश असा ग्रह लहान वयामध्ये मनामध्ये बिंबला होता.


Presenting on stage at my village school during Grade 4
Presenting on stage at my village school during Grade 4

योगायोगाने दहावीनंतर एक वर्षभर अमेरिकेमधील दोन परिवारांत राहण्याची संधी मिळाली (रोटरी युवा सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत) आणि माझे जग व विचारपद्धत पालटू लागली. आयुष्यामध्ये शिकण्यासारख्या अफाट शालेयबाह्य गोष्टी आहेत याचाही आभास होऊ लागला. तेथील शाळेमध्ये विविध तऱ्हेच्या माझ्या आवडीच्या विषयांचा स्वच्छंद व निर्भीड वातावरणात आनंद लुटता आला. मी शिक्षण कसे असावे या विचाराने प्रेरित झालो.



At my American High School
At my American High School

भारतात परतल्यानंतर पुढे कॉलेजचे शिक्षणदेखील अपूर्ण, तुटपुंजे, काहीसे निरर्थक वाटू लागले. व्यवस्थापकीय शिक्षण घेऊनदेखील सामाजिक क्षेत्राकडे अधिक कल असल्याने कॉलेजनंतर मी 'टीच फॉर इंडिया' या नव्याने साकारलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग घ्यायचे ठरविले. सध्याच्या शिक्षणपद्धतीबद्दल असलेली नाराजी असल्यामुळे ती बारकाईने जवळून जाणून घेऊन त्यात काही आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी युवकांना शिक्षण क्षेत्राकडे वळवण्यासाठी उपलब्ध केलेली ही संधी म्हणून मी त्यामध्ये भाग घ्यायचे ठरविले.


लहान मुलांशी तसा काहीएक संबंध नसताना त्यांचे भावविश्व, शैक्षणिक, भावनिक, शारीरिक गरजा व या सर्वांना असलेली सद्य:स्थितीची आर्थिक व सामाजिक चौकट याचे मला अत्यल्प ज्ञान होते. पुण्याच्या गुरुवार पेठेतील एका साधारण शाळेमध्ये तिसरी इयत्तेमधील ३४ विद्यार्थ्यांचा वर्गशिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. पूर्वी शिकवण्याचा काहीएक अनुभव नसल्याने आणि केवळ दीड महिन्याच्या उन्हाळी प्रशिक्षणााच्या आधारावर मी एक 'शिक्षक' म्हणून पहिले पाच-सहा महिने पुरता खचून गेलो. आजारी पडलो (तीन किलो वजनदेखील गमावले), मुलांवर खूप चिडचिड करू लागलो आणि त्यांना केवळ शांत करून कसेबसे परीक्षेत चांगले मार्क कसे मिळतील याची धडपड करू लागलो. हळूहळू माझ्या विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी एक मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यांच्याशी गप्पा-गोष्टी, खेळ, गाणी, सहली, नाटके आणि आवांतर प्रकल्प करण्यामध्ये एक वेगळीच मजा येऊ लागली आणि विद्यार्थ्यांबरोबर मीही खूप काही शिकू लागलो.


Teach for India Fellowship
Teach for India Fellowship

तरीदेखील शिक्षण कसे असावे हा विचार मात्र मला सतत भेडसावत राहिला. झोपडपट्टीमध्ये केवळ इंग्रजी माध्यमातून शिकविणे कितपत योग्य? परीक्षा व मार्कांना किती महत्त्व द्यायचे? अभ्यासक्रम कोणी ठरवायचा व तो कसा राबवायचा? मुलांच्या सर्वांगीण विकासाचे काय? त्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा, वाढत्या शहरीकरणाचा, महागाईचा व जीवघेण्या स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा आणि शिक्षण पद्धतीचा काय संबंध आहे? मी शिकवत असलेले विद्यार्थी भावी काळामध्ये कशाप्रकारच्या जगाला सामोरे जाणार आहेत? हे शिक्षण त्यांना कितपत व कसे उपयोगी ठरणार आहे? असे नाना प्रकारचे प्रश्न मला सतत ग्रस्त करू लागले.


Teach for India Fellowship
Teach for India Fellowship

दोन वर्षांच्या शाळेत शिकवण्याच्या कालावधीनंतर पुढे मी 'शिक्षण मानसशास्त्र' या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरविले व अमेरिकेमधील हार्वर्ड विद्यापीठामध्ये पदवी संपादन केली. मला 'जगावेगळे' अतिशय 'आधुनिक' काहीतरी मिळेल या आशेने मी तिथे गेलो होतो. परंतु सखोल पाहणीनंतर असे लक्षात येऊ लागले की अमेरिकेमध्ये देखील शालेय शिक्षण हे स्पर्धेच्या, परीक्षांच्या, बाजारीकरणाच्या जाळ्यात अडकलेले आहे आणि मुलांच्या मानसशास्त्राचा गैरफायदा बहुतांशी कंपन्या घेत आहेत. तेथील सुमारे २० हूनही अधिक प्रकारच्या शाळांना मी भेट दिली. एका वैशिष्ट्यपूर्ण शाळेमध्ये तीन महिने राहून जवळून अभ्यासदेखील केला. एवढ्या अथक वाटचालीनंतर पुन्हा पुन्हा भारताकडेच नजर जाऊ लागली. गांधीजींनी सुचवलेली नयी तालिम शिक्षणपद्धत, तसेच कृष्णमूर्ती, विवेकानंद, श्री अरविंदो, रविंद्रनाथ टागोर यांचे अतिशय प्रगल्भ शिक्षणविचार मला अधिकाधिक प्रभावशाली वाटू लागले. भारतात परतल्यानंतर शिक्षांतर व स्वराज युनिव्हर्सिटी (उदयपूर) या नावीन्यपूर्ण प्रकल्पांशी मी जोडलो गेलो आणि भारताच्या मातीत अजूनही जीवित असलेल्या अनेक सेवाभावी पर्यायी व अनौपचारिक शैक्षणिक प्रयोगांचा (Alternative and Informal) जवळून परिचय झाला.


Outdoor class with my students (Environmental Science) at The Valley School, Bangalore (Krishnamurti Foundation)
Outdoor class with my students (Environmental Science) at The Valley School, Bangalore (Krishnamurti Foundation)

साचेबाह्य, सहज-सोप्या शैक्षणिक पर्यायांचे देखील महत्त्व उमजू लागले. विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन योगदानही देता आले तसेच एका आदिवासी खेड्यात राहून नैसर्गिक शेतावर काम करता-करता स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीचाही बारकाईने अभ्यास करता आला व काही अंशी माझ्या पूर्वीच्या शिकण्याच्या आणि जगण्याच्या मान्यतांपासून मुक्त (unlearning) होता आले. या सर्व वाटचालीचा, विविध अनुभव तसेच वाचनाचा परिपाक म्हणून मला उलगडत चाललेले काही शिक्षण विचार पुढीलप्रमाणे थोडक्यात मांडत आहे ते असे... (यामध्ये अनेक शिक्षण विचारवंतांचे व आचारवंतांचे आशीर्वाद व प्रेरणा मला लाभली आहे हे नमूद करावे लागेल.)


  • शिक्षण हे जीवन आहे आणि जीवन हे शिक्षण आहे.


जगणे आणि शिकणे या दोन अविभाज्य गोष्टी आहेत ज्यांच्या आधारावरती मानवाचे अस्तित्व टिकून आहे. एखादी गोष्ट आपण शिकतो तेव्हा ती आपल्या अस्तित्वाचा, आचार-विचारांचा घटक बनते. अनुभव हा बहुमूल्य आहे आणि म्हणूनच 'कार्यातून शिक्षण' आणि 'शिक्षणातून कार्य' (Learning by doing / experiential learning) हा जीवनाचाच महत्त्वपूर्ण घटक आहे.


  • परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाची जोपासना हे शिक्षणाचे ध्येय आहे.


शिकता-शिकता आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीकडे (स्वधर्म आणि स्वभावाकडे) वळू लागणे महत्त्वाचे आहे. शिक्षणातून मनुष्याचा सर्वांगीण विकास - बौद्धिक, भावनिक, मानसिक, नैतिक, शारीरिक, सामाजिक व आध्यात्मिक, होणे अपेक्षित आहे. साहजिकच अशा शिक्षणामुळे केवळ आर्थिक स्वयंपूर्णताच नव्हे तर पर्यावरणीय परस्परावलंबनाची व सामाजिक उत्कर्षाच्या जबाबदारीची देखील जाणीव होते. संख्या व अक्षरज्ञान हे दोन केवळ माध्यमे आहेत. (शिकण्याची व जगण्याची अशी अगणित माध्यमे आहेत.) ती दोनच केवळ शिक्षणाचे प्रमुख उद्देश होऊ शकत नाहीत. ज्ञान जेव्हा खऱ्या अर्थाने प्रकट होऊ लागते तेव्हा सर्जनशीलता, हजरजबाबीपणा (Spontaneity), परस्पराबद्दलचा आदर, नम्रता, प्रामाणिकपणा, प्रेम, उदारपणा अशी मूलभूत मानवी मूल्ये आपोआपच समोर येतात. उत्कृष्ट शिक्षणाचे आणखी एक मोजमाप म्हणजे शरीर, बुद्धी व भावना (Head-Heart-Hands) यांचा समन्वय आणि त्यांना दिलं गेलेले समान महत्त्व.


  • शिक्षण ही सहजतेने उलगडत जाणारी (Organic) प्रक्रिया आहे.


शिकणे ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईच्या गर्भात आल्यापासून ते मृत्यूपर्यंत अविरतपणे ही प्रक्रिया चालू असते. माणसाची फुप्फुसे जशी सततपणे आणि निसर्गतःच श्वासोच्छवासाचे काम करत असतात त्याचप्रमाणे लहान मुले त्यांना लाभलेले अनुभव ग्रहण करत राहतात. मधमाश्या जशा ठराविक फुलांकडे मध प्राशन करण्यासाठी आकृष्ट होतात तशीच लहान मुले त्यांच्या अंत:प्रेरणेतून ठराविक अशा शिकण्याच्या / अनुभवण्याच्या संधीकडे आकृष्ट होत असतात. प्रत्येक व्यक्ती ही काही वैशिष्ट्यपूर्ण कलागुणांनी, क्षमतांनी बहरलेली असते. काही गोष्टी अगदी उपजतपणे नैसर्गिकरीत्या सहजशक्य झालेल्या असतात. शिक्षणप्रक्रियेमध्ये या आत दडलेल्या कलागुणांना, व्यक्तिमत्त्वाच्या बहुमूल्य अशा पैलूंना वाव व खुलेपणा दिला जातो. त्यामुळे मुले (आदर्श शिक्षणपद्धतीत) 'स्वस्थित' (Centered) होतात, आत्मशक्तीला जागृत करतात व आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने समतोल जीवन जगू शकतात. शिक्षकांची व या क्षेत्राशी जोडलेल्या सर्वांची (पालक अतिशय महत्त्वाचे!) भूमिका अशी असायला हवी की ही नैसर्गिक शिक्षणप्रक्रिया अबाधित राहील व मुलांना त्यासाठी चैतन्यपूर्ण, पोषक, विश्वासार्ह व प्रेमळ असे वातावरण मिळत राहील. अशा खुल्या वातावरणामुळे मुले चौकसपणे, प्रयोगशीलतेतून, अंतर्बाह्य भटकंतीतून स्वतःचे ज्ञान स्वतः रचू शकतील.


  • विद्यार्थ्यांचा लगाव हीच यशाची किल्ली.


खरे शिक्षण तेव्हा घडते जेव्हा आत्मप्रेरणेतून मुले त्यांच्या शिक्षणप्रक्रियेचा ताबा स्वतःकडे घेतात. कोणत्याही संकल्पनेशी विषयाशी किंवा कौशल्याशी जेव्हा विद्यार्थ्यांचा भावनिक सलोखा जडतो, जेव्हा शिक्षणाचा संबंध ते दैनंदिन जीवनाशी जोडू शकतात तेव्हा काहीही शिकणे सुकर, सोपे होते. आनंदी, स्वच्छंदी वातावरणात जेव्हा मुले चुका करू शकतात, विविध मार्ग चोखाळू शकतात, खरेखुरे / दैनंदिन जीवनातील प्रश्न हाताळू शकतात आणि स्वतः काही उपक्रम राबवू शकतात (Self-directed, project-based learning) तेव्हा शिक्षण हे आपोआप घडू लागते. प्रत्येकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कलागुणांचा, क्षमतांचा जर आदर केला गेला तर विविध प्रकारच्या वातावरणात, विविध ठिकाणी, नानाप्रकारचे प्रभावी व प्रफुल्लित असे शिक्षण उमलू शकते.


विपुल शहा, ​बारामती, महाराष्ट्र


​लेखक हे समुपदेशन, माइंडफुलनेस प्रशिक्षण, शिक्षण मानोविज्ञान तसेच मानसिक आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत आहेत.    



हा लेख प्रथम 'पंचायत भारती' (पुणे) च्या दिवाळी विशेषांकात प्रकाशित झाला होता. 


  • ​भारतभरातील  विविध नावीन्यपूर्णी, समग्र अशा  शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय तसेच अध्यात्मिक उपक्रमांची यादी -






Comments


Stay Connected!

Sign up for doses of inspiration, upcoming events and updates

Thanks for submitting!

  • Facebook
  • Instagram
  • LinkedIn
  • YouTube
  • mailto:vipul.shaha@post.harvard.edu
bottom of page